वाहतूक मंदावली
| सुकेळी | प्रतिनिधी |
सोमवारी (दि.13) सकाळी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे तसेच महामार्गावरील उडणाऱ्या प्रचंड धुरळ्यामुळे संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग हरवून गेला होता. जणू काही महामार्गावर धुक्याची चादर पसरली होती. या धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे महामार्गावरील तसेच आजुबाजुच्या परिसरातील वाहतूक देखील मंदावली होती.
दरम्यान वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे वाहतूक पुर्णतः धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा सुरु होत होता. त्याचप्रमाणे वातावरणातदेखील मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. रायगड जिल्ह्यामध्येदेखील सर्वत्र धुके पडल्यामुळे थंडीचे प्रमाण देखील वाढण्ण्या सुरूवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर, ब्लॅकेंट व चादरीचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धुक्याचे प्रमाण एवढे होते की, वाहनचालकांना वाहने चालवतांना समोरचे 8 ते 9 फुट अंतरावरील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्त्याच्या बाजुला उभी करुन ठेवली होती. काही वेळाने धुक्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरच पुन्हा वाहतूक सुरू झाली.
