पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीने निधीसाठी पाठपुरावा करा

। पोलादपूर । वार्ताहर ।
22 जुलै 2021 च्या अतिवृष्टीनंतर आता जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी पावसाळयानंतर सुरू होणारी पाणीटंचाई जाणवू नये यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने राज्यसरकारकडे निधीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी अलिबागचे माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष प्रभाकर पाटील यांनी येथे केली. पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक येथील बोरावळे गावचे माजी सरपंच निवृत्ती उतेकर यांचे वडील पांडूरंग रामजी उतेकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवार 9 नोव्हेंबर रोजी निधन झाले. या शोकाकूल कुटूंबियांची भेट घेण्यासाठी पंडीतशेठ पाटील हे रानवडी येथे गेले असता तालुक्यातील अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पाणीयोजनांच्या क्षेत्रातील गावकरी संभाव्य पाणीटंचाईग्रस्त होणार असल्याने पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी आ. पंडितशेठ पाटील यांनी, ग्रामस्थांच्या मागणीनुसार रायगड जिल्हा परिषदेकडून शासनाकडे अतिवृष्टीकाळातील बाधित पाणीयोजनांची नावे आणि खर्चाचा ताळेबंद जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांना सादर करण्यात आला आहे. या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी तातडीने जनतेची गरज लक्षात घेऊन तातडीची बाब म्हणून राज्यसरकारकडे पाठपुरावा करताना आगामी काळात पाणीटंचाई उद्भवण्यापूर्वीच निधी आणण्याची गरज असल्याचे यावेळी माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी राजिप सदस्या सुमन कुंभार, बोरावळे सरपंच वैभव चांदे, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सणस, मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर, बबन साने, सोपान चांदे, काशिनाथ कुंभार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version