अन्न व औषध प्रशासन विभागाचे उरणमध्ये दुर्लक्ष

उरण | वार्ताहर |
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिपत्याखाली जे जे विभाग येतात, त्या सर्वांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उरण शहरात व तालुक्यात सर्रासपणे त्याचे उल्लंघन होत आहे. याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे सदरच्या प्रशासनाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रणाखाली खाद्यपदार्थ, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, अन्नधान्य, बेकरी, औषध, चिकन, मांस अशा अनेक व्यवसायावर नियंत्रण असते. परंतु, उरणमध्ये अशा व्यावसायिकांकडून उघडपणे उल्लंघन होऊन जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. याबाबत संबंधित विभागाच्या वेगवेगळे वृत्त अनेकवेळा प्रसिद्ध होऊनही ठोस अशी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केल्याचे दिसत नाही. जोपर्यंत जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून उरण परिसरातील नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यावसायिकांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत हे व्यावसायिक उरणमधील जनतेच्या जीवाशी खेळत राहातील. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोणाला धरणार, असा सवाल यानिमित्ताने उभा राहात आहे.
उरणमधील नियमांचे उल्लंघन करून जनतेच्या जीवाशी खेळणार्‍या व्यावसायिकांची तक्रार अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांकडे करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून करण्यात येणार आहे.

Exit mobile version