| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील मजगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 या उपक्रमांतर्गत खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार करून लावलेले स्टॉल्स खवय्यांचे खास आकर्षण ठरले. मजगाव ग्रामपंचायत प्रशासक प्रसाद माळी यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत खाद्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी आपले पाककलेचे कौशल्य पणाला लावून वडापाव, भेळ, पुरणपोळी, पाणीपुरी, सँडविच, पोहे, उपमा तसेच विविध गोड रुचकर पदार्थ तयार केले होते. शाळेने राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वयंपाक कलेच्या ज्ञानात भर पडून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञान, व्यावसायिक शिक्षण सहकार्य, नियोजन आणि स्वावलंबन यांचे महत्त्व समजले. पाठ्यपुस्तकासोबत दैनंदिन जीवनात व्यवहार करता यावा, जीवनाभिमुख आवश्यक जीवनकौशल्य आत्मसात करता यावीत, यासाठी खाद्य महोत्सव व फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब फुंदे,चेतन चव्हाण,स्वप्नाली बाजी,हर्षा नांदगावकर,संतोष दहातोंडे शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. तर मुख्याध्यापिका रेश्मा धुमाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. हा खाद्यमहोत्सव विद्यार्थ्यांनसाठी आनंददाई आणि शिक्षणात्मक अनुभव ठरला.





