विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा

| ठाणे | वृत्तसंस्था |

दिव्यातील आगासन भागात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 88 मधील 44 विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली. या घटनेनंतर अत्यवस्थ विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून पाचवी ते सहावीच्या वर्गातील या विद्यार्थ्यांना पोषण आहारात दिली जाणारी खिचडी खाल्ल्यानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

कळवा येथील एका खासगी शाळेत 46 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेला 15 दिवस उलटत नाही तोच दिव्यातील शाळेमध्ये विद्याथ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली. शाळेत दुपारच्या सत्रातील विद्याथ्यर्थ्यांना मधल्या सुट्टीत खिचडी दिली. ही खिचडी खाल्ल्यानंतर विद्याथ्यांना पोटात मळमळू लागले. काहींना चक्कर आली, तर काही विद्याथ्यांना उलट्या सुरू झाल्या. या घटनेनंतर विद्याथ्यांची तपासणी केली असता 44 पैकी 39 मुलांना पोटदुखी आणि उलटीचा सर्वाधिक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच इतर मुलांनाही रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होत असल्याचा प्रकार समोर आला असल्याचा आरोप उबाठा पक्षाचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी केला आहे. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही.मुलांना देण्यात आलेल्या खिचडीमध्ये पाल असल्याचे आढळून आले असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे. अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त अशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

Exit mobile version