| माणगाव | वार्ताहर |
पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, येथे मंगळवारी (दि.30) फुटबॉल फॉर स्कूल या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळांसाठी फुटबॉल हा फिफाद्वारे युनेस्कोच्या सहकार्याने चालवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ज्याचे उद्दिष्ट सुमारे 700 दशलक्ष मुलांच्या शिक्षण, विकास आणि सक्षमीकरणामध्ये योगदान देण्याचे आहे. रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये फुटबॉल वाटप करण्याची जबाबदारी जवाहर नवोदय विद्यालयाकडे केंद्र सरकारद्वारे सोपवण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सुरुवात प्राचार्य के. वाय. इंगळे आणि नितीन बडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. विद्यालयाच्या संगीत विभागातर्फे केदार केंद्रेकर यांनी विद्यार्थ्यांच्या साथीने स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी पूर्वा पाटोळे, रत्नेश मोरे, मंदार सावळकर, आशुतोष रायकवार यांनी मनोगत व्यक्त केले. सीमा देव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.







