कागदावर विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे

शाळापूर्व तयारी मेळाव्यात अनोखे ‘पहिले पाऊल’

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव आणि नवगतांच्या स्वागतासाठी शाळेतील ‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा अनोखा उपक्रम शनिवार, दि. 20 एप्रिल रोजी राबवून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, पहिलीत प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेच्या उंबरठ्यात उभे करुन कुंकवाच्या पावलांचे ठसे कागदावर घेत अनोखे स्वागत करण्यात आले. आगळ्यावेगळ्या स्वागताने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहात होता. शाळांमधील परीक्षा संपल्या आहेत. एक ते दोन मे रेाजी अनेक शाळांमधील परीक्षांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर नव्याने पहिलीकध्ये शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी शाळा पूर्वतयारी मेळावा अभियान सुरु करण्यात आले आहे.

खासगीकरणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ही पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने शनिवारी जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी अभियान राबविले. या अभियानानिमित्ताने पहिलीमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत केले. पालकांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला. त्यानंतर शाळांच्या वतीने संपूर्ण गावांमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीमार्फत माझी शाळा माझा अभिमान, चिमुकल्यांना लावी लळा, आमची जिल्हा परिषद शाळा अशा अनेक घोषणा देत शिक्षणाबरोबरच रायगड जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व घोषणांद्वारे पटवून देण्यात आले. एक वेगळा उत्साह यावेळी दिसून आला.

ज्याप्रमाणे एखादी नववधू लग्न करुन सासरी येते, त्या घरात कुंकवाच्या पाऊल ठशांनी तिचा गृहप्रवेश लक्ष्मीच्या पावलांनी होतो. तिच्या या पावलांचा जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा, आपलेपणाचा आधार मिळतो व ती नवीन घरात, माणसात कधी मिसळते, हे तिला पण कळत नाही. हाच धागा पकडून जिल्ह्यातील शाळांमध्ये आगळावेगळा उपक्रम राबवून पहिलीमध्ये प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल या उपक्रमाने पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालक, ग्रामस्थांसह भव्य मिरवणूक काढून नव्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

विशेष म्हणजे, शाळेच्या पहिल्या दिवशी चौलमळा येथील प्राथमिक शाळेत दाखल करताना नवीन प्रवेशार्थी विद्यार्थ्याचे बैलगाडीमधून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, संपूर्ण शाळेची सजावट करण्यात आली होती. पहिले पाऊल टाकताना कागदावर कुंकवात उजवे पाऊल बुडवून त्यांचे ठसे घेण्यात आले. त्यावर शाळेचे व मुलांचे नाव शाळेत दाखल केल्याची तारीख टाकून तो कागद लॅमिनेशन करुन शाळेत जतन करुन ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता थळकर यांनी दिली. ज्या वेळेसे तो विद्यार्थी या शाळेतून शिक्षण पूर्ण करुन पुढील शिक्षणासाठी शाळा सोडेल, त्या वेळेस त्याचे शाळेत पडलले पहिले पाऊल त्याला भेट म्हणून दिले जाईल, असे सौ. थळकर यांनी सांगितले.

या उत्सवपूर्ण प्रवेशामुळे मुलांच्या मनातील भीती नष्ट होऊन शाळेविषयी जिव्हाळा निर्माण होऊन आपली मुले संस्कारक्षम नागरिक बनविणार्‍या शाळेत शिक्षण घेतात याचा अभिमान वाटत असल्याचे पालकांनी सांगितले. मुलांमधील भीती नष्ट होऊन ती आनंदाने शिक्षण प्रवाहात जाण्यास तयार होतात. या उपक्रमाचे दूरगामी फलित म्हणजे विद्यार्थी मोठा झाल्यावर त्याचे शाळेतील पहिले पाऊल त्याला आठवण म्हणून मिळते. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना तो कायम स्मरणात ठेवत असतोच, शिवाय त्याची बांधिलकी वाढते, अशी माहिती मुख्याध्यापिका विनिता थळकर आणि सहशिक्षिका रंजना घाटे यांनी दिली.


चौलमळा शाळेत बैलगाडीतून मिरवणूक
अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील जि.प.च्या शाळेत मुख्याध्यापिका विनिता थळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळापूर्व ‘पहिले पाऊल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पहिलीत प्रवेश करणारा विद्यार्थी अर्णव राजेंद्र पाटील याची संपूर्ण गावात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा स्तरावर सेल्फी पॉइंट, प्रवेशोत्सव सोहळा, पहिले पाऊल असे विविध उपक्रम राबविण्यात आले. एकही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये, मुलांना शाळेविषयी भीती नव्हे तर आवड निर्माण व्हावी, यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी चौलमळा गावचे उपप्रमुख जितेंद्र पाटील, जीवन लोहार, पालक राजेंद्र पाटील, अंगणवाडीच्या भारती पाटील, प्रमिला पाटील, मुख्याध्यापिका विनिता थळकर, सहशिक्षिका रंजना घाटे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढावी, जिल्हा परिषद शाळेबद्दल विद्यार्थ्यांना आकर्षण निर्माण व्हावे यासाठी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला. या उपक्रमालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक गावांमधून रॅली काढून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कृष्णा पिंगळा,
गटशिक्षणाधिकारी, अलिबाग
Exit mobile version