| अमरावती | प्रतिनिधी |
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात चुरशीची लढत होत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे केंद्र सरकारला दिलेला पाठिंबा, भाजपमध्ये नाट्यमय प्रवेश, लगेच उमेदवारी आणि जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा, यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राणांना जनतेच्या न्यायालयात अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतपेढीचा आधार त्यांना मिळाला होता. आता भाजपच्या परंपरागत मतांखेरीज विविध जात समूहांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत.
अमरावती मतदारसंघात 37 उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नवनीत राणा यांना गेल्या निवडणुकीत 5 लाख 10 हजार 947 मते (45.87 टक्के) मते मिळाली होती. मोदी लाटेतही अपक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांचे कौतुकही झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 73 हजार 996 मते (42.55 टक्के) प्राप्त झाली होती. आनंदराव अडसूळ महायुतीत असूनही राणांसोबत नाहीत. तर महायुतीचे घटक असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने राणांविरोधात दिनेश बुब यांना रिंगणात आणले आहे.
अमरावतीत प्रखर हिंदुत्वाचे राजकारण गेल्या काही वर्षांत बळावले. नवनीत राणा यांनी त्यावर स्वार होत जनाधार वाढवण्याचा प्रयत्न चालवला. चांगला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. काँग्रेसच्या कार्यकाळात मंजूर झालेला बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना पूर्णत्वास जाणे, अमरावतीत पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या उभारणीची घोषणा त्यांच्यासाठी अनुकूल ठरत असली, तरी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांशी वैरत्व, पक्षांतर्गत नाराजी, दलित आणि मुस्लिमांचा निसटलेला जनाधार या बाबी त्यांच्यासाठी अडचणीच्या बनल्या आहेत.