शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी त्यांचे देव पाण्यात

जयंत पाटील यांचा स्वकियांवर निशाणा

| सांगली | प्रतिनिधी |

शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच राष्ट्रवादी पासून शरद पवार बाजूला गेले असते, तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली. ते इस्लामपूर येथील एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाच लक्ष्य केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

जे होत आहे, ते चांगलंच होतंय. ही परिस्थिती अशीच राहिली पाहिजे, असा काहींचा प्रयत्न होता, असं सूचकपणे जयंत पाटील म्हणाले. मात्र जयंत पाटलांचा नेमका रोख कुणाकडे? याची जोरदार चर्चा झाली आहे. दुसरीकडे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने कामाला लागली आहे, असं पाटील म्हणाले.

भाजपाने शिवसेना फोडून 40 आमदार नेले. त्यानंतर संबंधित आमदारांच्या बाबतीत जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. यातून शिंदे गटाचे आमदार पुन्हा निवडून येणे अवघड आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेल्या त्या चाळीस आमदारांनी राजकीय आत्महत्या केली आहे. भाजपला देखील आता पुढील निवडणुकांमध्ये निवडून येऊ की नाही, ही भीती वाटत आहे. म्हणून भाजपाकडून राज्यातले इतर पक्ष फोडण्याचे कारस्थान गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल, अशी घोषणा दिली आहे. यावर पाटील म्हणाले, आम्हाला आता त्याची भीती नाही. ती एकनाथ शिंदे यांना असली पाहिजे. आणि फडणवीस आधीच आले आहेत, दोन नंबरवर बसले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाजूला ढकलून ते मुख्यमंत्री पदावर बसू शकतील. त्यामुळे त्याची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या 40 वीरांनी केली पहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

Exit mobile version