खासगी कंपन्यांनी झिडकारले, सरकारने सावरले

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्तांची व्यथा; सरकार उभारणार 172 घर, चार कोटींचा निधी
| रायगड | अविष्कार देसाई |
पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्यातून कोटक महिंद्रा आणि टाटा ट्रस्ट या खासगी कंपन्यांनी माघार घेतल्याने गेल्या दोन वर्षापासून पुनर्वसन रखडले होते. आता सरकारनेच जबाबदारी घेत येथील 172 घरांच्या उभारण्यासाठी तब्बल चार कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहेत. या आधीच नागरी सुविधांसाठी नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता तेथील दरड ग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, साखर-सुतारवाडी येथे 2021 रोजी दरड पडल्याने मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी झाली होती. दरड पडल्याने बेघर झालेल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी मोठ्या संख्येने खासगी कंपन्या पुढे आल्या होत्या. येथील दरडग्रस्तांना त्यांना त्यांच्या हक्काचे गर देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशा गमज्या मारल्या होत्या. त्यावेळी विविध वृतप्रत्रामध्ये त्यांच्या या बातमीने महत्वाच्या जागा घेतल्या होता. मात्र कालांतराने या ठिकाणी घरे बांधणे, नागरी सुविधा पुरवणे याबाबत सदरच्या कंपन्यांनी असमर्थता दर्शवत यातून माघार घेतली. कंपन्याच्या या घुमजाव धोरणामुळे येथील नागरिकांचे पुनर्वसन मात्र गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. कंपन्यांनी कोणत्या कारणांनी यातून माघार घेतली हे मात्र गुलदस्त्यातच असले, तरी स्थानिक राजकीय हस्तक्षेप यामागे असण्याची जोरदार चर्चा आहे.

त्यामध्ये सरकारने आता लक्ष घातले आहे. येथील नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सरकारने 172 घरे बांधण्यासाठी तब्बल तीन कोटी 95 लाख 60 हजार रुपये मंजूर केले आहेत. 2021 रोजी अतिवृष्टीमुळे दरड या ठिकाणी दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी झाली होती. तब्बल दोन वर्षाने सरकारने निधीला मंजूरी दिली आहे मात्र घरे बांधताना ती चांगल्या प्रतिची असणे गरजेचे आहे.

केवनाळे, साखर-सुतारवाडी येथे दरडी पडल्याने मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी झाली होती. नागरिकांना दर पावसाळ्यात अन्यत्र स्थलांतरीत करावे लागत होते. तेथील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी घरे बांधण्यासाठी मंजूर केला आहे. सदर गावातील दरड कोसळून बाधित झालेल्या नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने घरे बांधणे, भूसंपादन आणि नागरी सुविधांसाठी अशी कामे तातडीने करणे गरजेचे होते. त्यानुसार आता निधी मंजूर झाल्याने घर बांधण्यांच्या कामाला गती येणार असल्याचे बोलले जाते.

बाधित कुटुंबाला 2 लाख 30 हजार
केवनाळे घरांची संख्या 128 प्रत्येक घरांसाठी दोन लाख 30 हजार प्रमाणे दोन कोटी 94 लाख रुपये तर, साखर-सुतारवाडी येथे 44 घरे उभारण्यासाठी दोन लाख 30 हजार प्रमाणे एक कोटी एक लाख 20 हजार रुपये अशा एकूण 172 घरांसाठी तीन कोटी 95 लाख 60 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केवनाळे साठ 3.76 हेक्टर तर सुतारवाडी साठी 2.27 हेक्टर जमीनीचे संपादन केले आहे. तसेच नागरीसुविधांसाठी नऊ कोटी रुपये आधीच मंजूर आहेत.

Exit mobile version