। कर्जत । वार्ताहर ।
भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे होत आली तरी कर्जत तालुक्यातील तुंगी गावाला जायला रस्ताच नव्हता मात्र खा. श्रीरंग बारणे यांनी त्यात लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याचे काम मार्गी लागले त्यामुळे या गावातील ग्रामस्थांची अवघड रस्त्याची अडचण दूर झाली. बारणे यांची गाडी या कच्च्या रस्त्याने थेट तुंगी गावात पोहोचली आणि ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जत तालुक्यात अनेक गावे सोयी सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्य मिळूनही जीवनावश्यक वस्तूंसाठी या गावांमधील नागरिकांना संघर्ष करावा लागत होता. कर्जत तालुक्यातील तुंगी हे गाव उंच डोंगरमाथ्यावर वसलेलं शंभर उंबरठ्यांचे असून जेमतेम पाचशे वस्तीच हे गाव आहे. शिवकालीन इतिहासाच्या पाऊल खुणा अंगावर मिरवणार्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाला शासकीय लाल फीतीमुळे शापित जीवन जगावे लागत होते. गावात मूलभूत सुविधांचा अभाव पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असून पर्यायी पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो, पाण्यासाठीची ही ससेहोलपट तुंगी वासियांच्या नशिबी गेली अनेक वर्षांपासून होती.
गावाला जोडण्यात येत असलेल्या रस्तात वन खात्याची जमीन येत असल्याने गावाला रस्ता मंजूर होत नव्हता. मात्र बारणे यांनी स्वतः लक्ष घालून गाव रस्त्याला जोडले जाण्यासाठी वन खात्याकडून ग्रीन सिग्नल मिळवला आणि या रस्त्यासाठी खासदार निधीतून त्यांनी 18 लक्ष रुपये दिले असूनआदिवासी प्रकल्प योजने मधून 50 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊन कामही सुरू झाले. संपूर्ण डोंगरातून हा रस्ता तयार होत आहे. आता कच्चा रस्ता गावापर्यंत पोहोचला आहे.