अनिल परबांची सलग चौथ्या दिवशी ईडी चौकशी, शिवसेना दुहेरी संकटात

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे ढग गडद होत चालले आहेत. अशातच शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेना आमदारांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. अनेक आमदार ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भितीमुळे शिंदे गटात सामील होत असल्याचं बोललं जात आहेत. तसेच, सत्ताधाऱ्यांकडूनही असेच आरोप केले जात आहे. एकिकडे शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय, तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब गेले तीन दिवस ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. काल (गुरुवारी) अनिल परबांची सलग तिसऱ्या दिवशी सहा तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. तर परबांना आज 11 वाजता पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलं आहे. आज सलग चौथ्या दिवशी दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची ईडी चौकशी होणार आहे.

ईडीनं अनिल परब यांना आज, शुक्रवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मागील तीन दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवारी तब्बल 11 तास, बुधवारी जवळपास आठ तास, तर गुरुवारी सहा तास ईडीनं अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. आज अनिल परब यांना ईडीनं पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. आज पुन्हा एकदा अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत. सकाळी 11 वाजता परब यांना चौकशीसाठी बोलवण्यात आहे. ईडीनं अनिल परब यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितलं होतं. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापे मारले होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.

Exit mobile version