| रायगड | खास प्रतिनिधी |
आमदार भरत गोगावले यांना मंत्री करुन त्यांची रायगडच्या पालकमंत्री वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातील शिंदे गट सर्क्रिय आहे. दुसरीकडे अदिती तटकरे यांनाच पालकमंत्री पद मिळावे, यासाठी स्वतः खा. सुनील तटकरे भाकरी फिरवित आहेत. या दोघांच्या भांडणांमुळे शिंदे-फडणवीस सरकार मेटाकुटीला आले आहे. यातून सुवर्ण मध्य म्हणून भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याच गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मंत्री मंडळाचा विस्तार करुन थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मंत्री करण्यात आले. त्यामुळे शिंदे गट नाराज झाला, तर भाजपाच्या आमदारांमध्ये देखील कुरबूरी वाढल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते. रायगड जिल्ह्यात सध्या भाजपाचे प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील आणि महेश बालदी हे तीन आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागच्या महेंद्र दळवी यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या एकमेव आमदार असून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्या आमदारांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या पैकी एकालाही मंत्री करण्यात आलेले नाही. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार भरत गोगावले हे तीन वेळा विधान परिषदेवर निवडून असल्याने वरिष्ठांच्या यादीत येतात. सध्या गोगावले हे मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशींग बांधून उभे आहेत. मंत्री आणि नंतर पालकमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सातत्याने दबाव टाकत आहेत. तर दुसरीकडे आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री असावे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक असल्याचे दिसते. हा तिढा अत्यंत गुंता गुंतीचा झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जाते.
यातून मार्ग काढण्यासाठी पनवेलमधील भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्री करुन त्यांच्याकडेच रायगडच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार देण्यावर भाजपच्या गोटात विचार विनिमय सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.