| पेण | संतोष पाटील |
पेण तालुक्यात घडलेल्या गर्भपात प्रकरणामुळे गर्भाशयात किती कोवळ्या कळ्या नष्ट केल्या जातात हे विदारक वास्तव नजरेसमोर आले असून, अशा प्रकारे गर्भपात करणार्यांवर आणि त्यासाठी महिलांना प्रवृत्त करणार्यांवर कायद्यान्वये कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
पेण तालुक्यातील दादर-सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरेडी गावामध्ये एक नुकताच भयावह प्रकार झाला. जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात वरेडी येथील एका विवाहित महिलेचे तिच्या इच्छेविरुद्ध सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून गर्भ नष्ट करण्यात आला. या गर्भपातामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. महिलेची इच्छा नसताना ज्या डॉक्टरने हा गर्भपात केला. त्या डॉक्टरच्या अक्षम चुकीमुळे महिलेला त्रास होउ लागला. त्रास एवढा झाला की, पेणमध्ये कोणताही डॉक्टर या महिलेस आपल्या दवाखान्यात घ्यायला तयार नव्हता. अखेर या महिलेला मुंबई गाठावी लागली. जे.जे.हॉस्पिटल येथे महिलेला दाखल केली खरी परंतु होणार्या त्रासाशी झुंज देत असताना महिलेला प्राण गमवावा लागला.
या सर्व प्रकारात पोलिसांनी डॉ. शेखर धुमाळ यांना अटक केले. तसेच पिडीत महिलेचा नवरा रोशन कोळी, व सासू सुभद्रा कोळी यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. परंतु एवढे करूनच हा प्रश्न सुटत नाही. या प्रश्नाच्या मुळाशी जाणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वंशाला दिवा हवायं हा विचार अद्यापही समाजातून गेला नाही. मुलगा आणि मुलगी यांच्यात अजूनही भेद केला जातो. त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये लिंग भेदाचे अस्तित्व कायम असल्याचे आपल्याला पहायला मिळते.या घृणास्पद प्रकारात जे डॉक्टर लिंगनिदान चाचण्या करून पैसा तर कमवतात आणि कित्येक कळ्या फुलण्या अगोदरच त्यांचे गर्भाशयातच जीवन यात्रा संपवली जाते. याला जिम्मेदार जेवढे वंशाला दिवा हवाय म्हणणारे आहेत, तेवढेच जिम्मेदार लिंग निदान चाचण्या करणारे डॉक्टर ही आहेतच,अशी संतापजपन प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटू लागली आहे.
खर पाहता मुलगी हीच खरी वंशाचा दिवा आहे. कारण ती एका वंशाचे नाव मोठे करत नाही तर ती माहेर आणि सासर या दोन्ही वंशाचे नाव मोठे करत असते. परंतु हे सांगेल कोण? आजसुध्दा समाजात मुलगा हवा या हव्यासापोटी कित्येक संसार उद्ध्वस्त होताना आपल्याला पहायला मिळतात. पण खरं सांगायचं तर स्त्री हीच स्त्रीची दुश्मन आहे. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ अशीच काहीसी स्थिती समाजात आज आहे.
धुमाळांकडे सर्रास गर्भपात?
जोहे येथील ज्या दवाखान्यात हा गर्भपात केला गेला. त्या दवाखान्यात अनेक वेळा असे प्रकार घडत असतात असा आरोप आहे. तसेच डॉक्टरला पूर्ण माहिती होती की पिडित महिलेच्या मनाविरूध्द गर्भपात केला जात आहे. असे असताना देखील पैसे कमवायच्या नादात हा प्रकार डॉक्टर करून मोकळा झाला असे बोलले जाते.
शासनाने बंदी घातलेली असताना लिंगनिदान चाचणी कशी काय होते याचाच अर्थ वैद्यकीय क्षेत्रावर नियंत्रण नाही असेच म्हणावे लागेल. आता निदान याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन हा खटला लवकर निकाली काढावा अशी मागणी होत आहे.