| पनवेल | प्रतिनिधी |
कार चालकाने ऊसाच्या दांडक्याने मारहाण करून एका व्यक्तीच्या खिशातील तीन लाख रुपये जबरीने चोरून नेल्याचा प्रकार कळंबोली येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
39 वर्षीय विशाल नामदेव टावरे यांचा टाईल्स सप्लायरचा व्यवसाय आहे. त्यांनी 3 लाख रुपये पँटच्या खिशात ठेवले होते. ते दुकानात काम करणाऱ्या मुलासोबत दुचाकीने टाईल्सचे सॅम्पल घेऊन सायन-पनवेल हायवे मॅकडोनाल्ड समोरील बस स्टॉप जवळ गेले. टाइल्सचे सॅम्पल पुण्याला द्यायचे आहे, तुम्ही नेणार का व किती रुपये लागतील, असे त्यांनी कार चालकाला विचारले. या वेळी त्याने 500 रुपये लागतील असे सांगितले. त्याला 100 रुपये घ्या, असे बोलले असता कारचालकाने शिवीगाळ केली.
त्यानंतर विशाल हे मोबाईलमध्ये रस्त्यावरील वाहतुकीची व्हिडीओ शूटिंग करत असताना त्या कारचालकाने त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर तुझी तक्रार पोलिसांना करेन, असे विशाल कार चालकाला बोलून ते पेट्रोल पंपाच्या समोरील रस्त्यावर आले. कळंबोली सर्कलच्या दिशेने पायी जात असताना पाठीवर जोरात कोणीतरी काहीतरी मारले. विशाल यांनी मागे पाहिले असता त्या कारचालकाने हातातील उसाच्या दांडकाने मारहाण केली. त्याने विशाल यांचया दोन्ही खिशातून 3 लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर तो शिवीगाळ करत निघून गेला.