। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या 27 वर्षीय परदेशी तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना खार येथे घडली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी तत्परतने तपास करून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सची नागरिक असलेली 27 वर्षीय तक्रारदार तरूणी पर्यटनासाठी मुंबईत आली होती. सध्या ती वांद्रे येथे रहात होती. 8 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ती खार पश्चिम येथील रस्त्यावरून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिला थांबवून भर रस्त्यात तिचा विनयभंग केला होता. याबाबत तिने शनिवारी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. परदेशी नागरिकांशी संबंधित हा गुन्हा असल्याने पोलिसांनी प्रकरण गांभिर्याने घेऊन तपास सुरू केला होता. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून पोलिसांनी सुनिल वाघेला (25) या आरोपीला अटक केली. तो धारावी येथे राहणारा आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







