परदेशी पाहुणे रमले भारतभूमीच्या मातीत; विद्यार्थ्यांसोबत बनवले मातीचे दिवे

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

दिवाळीच्या सणात लहान मुले मातीचे दिवे, गडकिल्ल्यांची प्रतिकृती बनवीत असतात. अशातच परदेशी पाहुणे दिवाळीत आले आणि त्यांच्यासमवेत मातीच्या वस्तू बनविण्याची संधी मिळाली तर मुलांच्या आनंदाला पारावर उरत नाही. पालीतील जॅक अँड जिलच्या विद्यार्थ्यांना या दिवाळीत असा आगळावेगळा आनंद अनुभवयास मिळाला.

दिवाळीत परदेशी अमेरिकन पाहुणे भारतभूमीच्या मातीत रमल्याचे पहावयास मिळाले. पालीत जॅक अँड जिलच्या विद्यार्थ्यांसोबत मिसळून त्यांनी मातीचे दिवेदेखील बनविले. जॅक अँड जिल च्या संचालिका तथा प्रिन्सिपल प्रभा द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. लहान मुले दिवाळीत दिव्यांचा प्रकाश नेहमीच पाहतात, मात्र हे मातीचे दिवे कसे बनतात, कसा आकार घेतात, हे त्यांना माहीत नसते, जॅक अँड जिल शाळेत मातीचे दिवे कसे बनवितात याचे प्रात्यक्षिक दिले. मातीशी खेळत ही मुले खूप आनंदात व उत्साहात दिवे बनवत होती. कारण त्यांना माती हाताळायला मिळत होती. आजकालच्या मुलांचे मातीशी नाते तुटले व मोबाईल हाती आले. विशेष म्हणजे परदेशी पाहुणे ही कुतूहलाने दिवे बनवायला शिकत होते. तुषार केळकर व दोन अमेरिकन पाहुण्या या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. जॅक अँड जिलच्या संचालिका तथा प्रिन्सिपल श्रीमती प्रभा द्रविड व त्यांचे सहकारी प्रणाली शेठ, शिल्पा जतीन पाटील, व इतर स्टाफ उपस्थित होता.

दिवाळी हा सण जीवनात आनंद, सकारात्मक ऊर्जा व प्रकाश आणणारा सण आहे. दिवाळीत भारतमातेच्या मातीला मान द्या. येथील मातीने बनविलेल्या दिव्यांनी ही भूमी प्रकाशमय करा, मातीच्या दिव्यांनी भारतभूमी तेजोमय करून टाकूयात.

प्रभा द्रविड, संचालिका जॅक अँड जिल
Exit mobile version