पोलादपूरजवळ ट्रक, मोटारसायकलसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी अटकेत
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर शहरालगत वनविभागाने सापळा रचत गुजरात राज्यातून चिपळूणकडे सुरू असलेली अवैध खैराची वाहतूक उधळून लावली. या धडक कारवाईत खैर लाकडाचा मोठा साठा वाहून नेणारा ट्रक तसेच ट्रकला रस्ता दाखवणारी मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, दोन्ही वाहनांसह सुमारे 7 लाख 1 हजार 66 रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या ताब्यात आला आहे. या कारवाईमुळे चिपळूण हे अवैध खैर तस्करीचे केंद्र असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.
मंगळवार, दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोलादपूर वनउपज तपासणी नाक्यावर एक ट्रक संशयास्पदरित्या जात असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तपासादरम्यान ट्रकच्या पुढे यामाहा एफझेड ही मोटारसायकल पथदर्शक म्हणून चालत असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ हालचाल करत वनविभागाच्या पथकाने ट्रक आणि दुचाकी अडवून मोहम्मद अर्शद (रा. गुलशन नगर, दाहेली, जि. बलसाड, गुजरात) व मोहम्मद उस्मान मुबीन खान (रा. जनाबजी चाळ, खिंडीपाडा, मुलुंड कॉलनी, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत खैर वृक्षाचे 201 तुकडे जप्त करण्यात आले असून, त्याचे एकूण मोजमाप 4.773 घनमीटर इतके आहे. बाजारभावानुसार या मालाची किंमत सात लाख एक हजार 66 रुपये असून, ट्रक व दुचाकी दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
अवैध खैर वनोपज वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना दि. 14 जानेवारी रोजी महाड येथील न्यायदंडाधिकारी (वर्ग 1) यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात ट्रकचा मूळ चालक चिपळूणचा रस्ता माहिती नसल्याने त्याला पनवेल येथे उतरवून दुसरा चालक बसवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, हा खैर साठा चिपळूणमध्ये नेमका कोणाला आणि कुठे पुरवठा होणार होता, याबाबतचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक रोहा व सहाय्यक वनसंरक्षक (विकास व कॅम्प) रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशिष पाटील, पोलादपूर वनपाल बाजीराव पवार तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. वनसंपत्तीच्या लुटीविरोधात वनविभागाचा हा कठोर इशारा मानला जात असून, अवैध तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.







