जलविद्युत प्रकल्पामुळे वनसंपदा धोक्यात

टोरांटविरोधात कर्जतकरांची संतापाची लाट; खासगी जमीन देण्यास स्थानिकांचा विरोध

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दुबार भाताच्या पीक घेतल्या जाणाऱ्या जमिनीवर टोरंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प आणण्याचा घाट सरकारने घातला आहे. या प्रकल्पामुळे तेथील नैसर्गिक संपदा नष्ट होणार असून पर्यटक आणि ट्रेकर्स यांचे आवडीचे ठिकाण असलेले ढाक तसेच बाराही महिने हिरवेगार असलेले क्षेत्र लोप पावणार आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पासाठी पुढाकार घेऊ नये, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून होत आहे.

1960 च्या दशकात राजनाला कालव्याचे पाणी कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात येऊ लागले आणि तेंव्हापासून कर्जतचा पूर्व भाग बाराही महिने हिरवागार असतो. 40 हुन अधिक गावातील शेतकरी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अशा दोन्ही हंगामात शेत जमिनीतून पीक घेतात. त्यामुळे या भागातील जमिनीला कायम मागणी राहिली असून फार्म हाऊसच्या तालुक्यात या राजनाला भागातील शेतजमिनीला विशेष मागणी राहिली आहे. त्यातच पोटल, पाली, भालिवडी, कोतवाल खलाटी, आंबोट आणि ढाक या गावातील जमिनीवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याची संकल्पना शासनाला सुचली आहे. टोरंट कंपनी आपला जलविद्युत प्रकल्प 377 हेक्टर जमिनीवर उभारणार आहे. या प्रकल्पासाठी 144 हेक्टर जमीन हि खासगी जमीन असून ती जमीन देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पाबाबत जनसुनावणी जाहीर झाल्यावर माहिती याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यात आपली दुबार पिके देणारी जमीन देण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे शासनाच्या या भूमिकेबद्दल कर्जतकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

वन विभागाचा दुजाभाव
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जमिनीपैकी 65 टक्के वन क्षेत्र असून खासगी जमीन क्षेत्र कमी आहे. 233 हेकटर वन जमिनीची आवश्यक असलेल्या या प्रकल्पासाठी एक इंच देखील जमीन देण्यात आलेली नाही. असे असतानाही त्या वन जमिनीवर टोरंट कंपनीचे लोक तंबू ठोकून राहत आहेत. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्याने एक झाड तोडले किंवा वन जमिनीमध्ये जाऊन क्रिकेट खेळले तर कारवाईचा बडगा वन विभागाकडून उभारणारा जातो. परंतु, वन विभागाकडून टोरंट कंपनीवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे वन विभागाकडून दुजाभाब होत असून वन विभागाचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, असा प्रश्न स्थानिक विचारू लागले आहेत.
मिनी माथेरान संपुष्ठात
टोरंट कंपनीच्या जलविद्यूत प्रकल्पामुळे जिल्ह्यातील मिनी माथेरान म्हणून ओळखले जाणाऱ्या ढाक या गावाचे अस्तित्व संपुष्ठात येणार आहे. ढाक गावात संपूर्ण डोंगर कंपनी खरेदी करणार असून त्या भागातील एका घळीमध्ये पाणी अडवून वीज निर्मितीचे स्वप्न टोरंट कंपनी पाहत आहे. काही कुटुंबाचे निवास असलेल्या ढाक गावातील जमिनीवर बाहेरच्या लोकांचा डोळा असून या ठिकाणी माथेरान सारखे पर्यटन स्थळ उभारण्याचे स्वप्न जलविद्युत प्रकल्पामुळे स्वप्नच राहणार आहे.
असा असणार जलविद्यूत प्रकल्प
साई डोंगरावर वसलेले गाव भयानक आजारामुळे स्थलांतरित झाले होते. त्याच साई डोंगर नावाने टोरंट कंपनी जलविद्यूत प्रकल्प उभारत आहे. साईडोंगर हा 3000 मेगावॅट उदंचन जलविद्युत प्रकल्प कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी, पोटल, साईडोंगर, अंबोट, ढाक, भालिवडी या गावांमध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत दोन जलाशय बांधले जाणार असून त्यातील एक साई डोंगर येथे तर दुसरा ढाक येथील डोंगरावर बांधला जाणार आहे. ऊर्ध्व जलाशय सुमारे 27 मीटर उंच धरण बांधून डोंगराच्या माथ्यावर मौजे ढाक येथे उभारण्यात येणार आहे. तर, साईडोंगर येथे 59 मीटर उंचीचे धरण बांधून पेज नदीवर प्रस्तावित आहे.
Exit mobile version