तळा तालुक्यात वनसंपदा धोक्यात

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यात काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने वनसंपदा धोक्यात येत चालली आहे. यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ह्रास होत असून तो वेळीच रोखणे गरजेचे झाले आहे.

जंगलात लागणारे वणवे हे नैसर्गिकरित्या कमी तर मानवनिर्मित जास्त असतात. अथक परिश्रम घेऊन शेतकरी आपल्या जागेत आंबा, काजूसह अनेक फळांच्या बागा फुलवितात. मात्र, वणव्यांमुळे अशा अनेक बागांची काही क्षणात राखरांगोळी होते. अनेक गावांत सायंकाळी किंवा पहाटेच्या वेळी गवतासह झाडाचा पालापाचोळा जाळण्यासाठी काही नागरिकांकडून वणवे पेटवले जातात. मात्र, वार्‍याच्या वेगात वणवा सर्वत्र पसरत असून, त्यातून पुढे अनेक दुर्दैवी घटना घडतात.

बहुतांश गावातून शेतकरी भातपीक घेण्यासाठी राब तयार करतात. त्यासाठी गवत, पेंढा, कवळ, शेणाचा वापर करतात. यात कवळ तोडीचा फटकाही झाडांना बसत आहे. तसेच, तरव्यासाठी वणवे पेटवले जात असल्याने त्याचा फटका येथील वनसंपदेला व शेतीला बसू लागला आहे. डोंगरातील अशा वणव्यांमुळे येथील विविध प्रकारची उपयुक्त वृक्षवेलीही नष्ट होऊ लागल्या आहेत. वणवा विरोधी कायदा असला तरी तो सक्षमपणे राबवला जात नसल्याने कायद्याचे भय वणवे पेटवणार्‍या मंडळींना उरलेले नाही. परिणामी, गेल्या काही वर्षांपासून वणव्याचे प्रकार वाढत असल्याने वणवा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत वनप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version