। तळा । वार्ताहर ।
तालुक्यातील गावांमध्ये सीएसआर फंडातून ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. या वनराई बंधार्यामुळे बरेच दिवस पाणी अडवून ठेवता येणार असल्याने गाई, गुरे, पशू-पक्षी यांची तहान भागणार आहे. याशिवाय शेतकरी वर्गालाही भाजीपाला लागवडीला मदत होणार आहे.
पन्हेळी या गावाच्या हद्दीत सीएसआर फंडातून पिशव्या उपलब्ध झाल्याने कृषी विभाग तळा व गावकर्यांच्या श्रमदानाने वनराई बंधारे बांधले गेले आहेत. पन्हेळी येथे पाच बंधारे बांधण्यात आले आहेत. गावातील महिला, पुरुष यांच्या मेहनतीने हे बंधारे बांधण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या कामी निर्जला चोरगे, नामदेव बटावले, रमेश पाखड, प्रकाश चोरगे यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे मालुक ग्रामस्थांच्या सहकार्यातूनही श्रमदानाने वनराई बंधारा बांधला आहे.
या बंधार्यांमुळे गायी-गुरे, पशू-पक्षी यांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबर या पाण्याचा वापर भाजीपाला लागवडीसाठीही शेतकरी वर्गाला होणार आहे. यावेळी शारदा काप, सुगंधा पागार, ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहायक दिनेश चांदोरकर उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सागर वाडकर, कृषी सहायक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावांमध्ये श्रमदानातून बंधारे बांधले जात आहेत.