श्रमदानातून वनराई बंधारा

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुका कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या निसर्गरम्य अक्कादेवी धरण परिसरातील ओढ्यांवर रविवार (दि.8) रोजी, श्री महागणपती सेंद्रिय गटातील शेतकर्‍यांच्या श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

वनराई बंधारे शेतकर्‍यांसाठी आणि पशु पक्षांसाठी वरदान ठरत आहेत. वनराई बंधारे बांधून पाणी अडविले तर या पाण्यामुळे विविध प्रश्‍न मार्गी लागतात. सध्या कृषी विभागामार्फत वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरू झाली असून, तालुक्यात अजून बर्‍याच ठिकाणच्या ओढ्यांवर वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर, कृषी सहाय्यक सुरज घरत, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली. यावेळी शेतकरी संजय पाटील, अनिल केणी, भास्कर ठाकूर, दामोदर मुंबईकर, बाळकृष्ण ठाकूर, समाधान पाटील, विजय म्हात्रे, मिलिंद ठाकूर, मंगेश ठाकूर, शशिकांत ठाकूर, रघुनाथ ठाकूर आदींनी श्रमदानातून बंधारा उभारण्यास सहकार्य केले.

पाणी आपले जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. पशुपक्षी, झाडे, मानव यांच्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. यासाठी पाण्याचे महत्त्व जाणून बंधारा बांधून पाणी अडविले, तर या पाण्याचा वापर गुरांची तसेच जंगली प्राण्यांची तहान भागवण्यासाठी करता येईल. शिवाय परिसरातील शेतकर्‍यांना भाजीपाल्याचे उत्पादन घेता येईल. यातून रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल.

– ऋतुजा नारनवर, तालुका कृषी अधिकारी


सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरून प्रवाह असलेल्या ठिकाणी माती भरलेल्या गोणी एकावर एक रचून ठेवल्यास काही महिने पाणी या ठिकाणी जमा होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होते.

– सूरज घरत, कृषी सहाय्यक अधिकारी

Exit mobile version