भाजप, शिंदे गट एकत्र येणार का?
| तळा | वार्ताहर |
दिवसेंदिवस राज्य पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे तळा शहरातील राजकारण देखील ढवळून निघत आहे. पटत नाही म्हणून ज्यांच्या सोबत राजकीय संसार मोडला त्यांच्या सोबतच पुन्हा संसार करण्याची वेळ तळा शहरातील भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांवर येऊन ठेपली आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवि मुंढे व नुकतेच शिंदे गटात सहभागी झालेले शहरप्रमुख राकेश वडके पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रवि मुंढे यांची जिल्हाभरात स्वतःची वेगळी ओळख आहे. बाळशेठ लोखंडे यांच्या निधनानंतर तळा शहरातील राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रवि मुंढे हे शिवसेनेत असताना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अवधूत तटकरे यांच्या विरुद्ध त्यांना केवल 77 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार त्यांनी प्रामाणिक काम करून दक्षिण रायगडमध्ये शिवसेनेची संघटना वाढवली.
एवढेच नाही तर पहिल्यांदाच नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर नगरपंचायतीत आपल्या पत्नीच्या रूपाने शिवसेनेला पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान मिळवून दिला. मात्र काही महिन्यांचा कालावधी लोटताच पक्षात मतभेद सुरू झाले. नगरपंचायतीकडून करण्यात येणार्या विकासकामांच्या ठेकेदारीवरून अंतर्गत धुसफूस वाढू लागल्याचे बोलले जाते व ही धुसफूस एवढी वाढली की सेनेत गटातटाचे राजकारण होऊ लागले. शेवटी शेवटी नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर रवि मुंढे यांना पक्षाच्या कार्यक्रमात डावलले जाऊ लागले. तसेच वरिष्ठांकडूनही विचारले जात नसल्याने त्यांची पक्षात घुसमट होऊ लागली. अखेर पत्रकार परिषद घेऊन रवि मुंढे यांनी राकेश वडके, लिलाधार खातू व नमित पांढरकामे यांच्यावर जहरी टीका करून शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले व भाजप मध्ये प्रवेश करून पुन्हा सक्रिय झाले.
दुसरीकडे शहर प्रमुख राकेश वडके यांनी शहर शिवसेनेवर आपली मजबूत पकड कायम ठेवली. रवि मुंढे भाजपात गेल्यानंतर शिवसेनेकडे चेहरा नसतानाही राकेश वडके यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवली. तसेच निवडणुकीत विकासाच्या जोरावर मतदारांना सामोरे गेले. दुसर्यांदा झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्याचा फायदा राष्ट्रवादी ला होऊन नगरपंचायतीवर राष्ट्रवादी ची सत्ता स्थापन झाली. मात्र राज्यात आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. अशातच शहरप्रमुख राकेश वडके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता तळा शहरातील भाजप व शिंदे गट एकत्र येणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. पटत नाही म्हणून दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांसोबतचा आपला राजकीय संसार मोडला मात्र राज्यात एकत्र आलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमुळे तळा शहरातील नेते देखील एकत्र येतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.