माजी सैनिकाच्या पेन्शनचा मार्ग मोकळा

हयातीच्या दाखल्यासाठी डोळ्यांचा स्कॅन
पालीतील निलेश शिर्के यांच्या प्रयत्नांना यश
सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील वृद्ध माजी सैनिक बबन गोळे यांचे निवृत्तीचे वेतन हयातीचा दाखला सादर न केल्याने मागील सात महिन्यांपासून जमा झाले नव्हते. हाताचे ठसे येत नसल्याने दाखला मिळत नव्हता. त्यासाठी त्यांची फरपट सुरू होती. अखेर पालीतील ई-सेवा केंद्राचे चालक निलेश शिर्के यांनी स्वखर्चाने डोळ्यांचे स्कॅन करणारे मशीन आणून त्याद्वारे गोळे यांना हयातीचा दाखला 15 ऑगस्टला मोफत मिळवून दिला आहे. आणि, वृद्ध माजी सैनिकांना मोफत हयातीचा दाखला देण्याचा संकल्प केला.
निलेश शिर्के यांनी सांगितले, की बबन गोळे माझ्या सेवा केंद्रात डिसेंबर 2020 मध्येच त्यांचा हयातीचा (जीवन प्रमाणपत्र) दाखला ऑनलाइन सादर करण्यासाठी आले होते. मात्र, वयोमानानुसार त्यांच्या हाताचे ठसे घेता येत नव्हते. त्यांच्या डोळ्यांचे चित्र घेऊन ते शक्य होते. मात्र, त्यासाठीचे लागणारे इरिस स्कॅनर माझ्याकडे उपलब्ध नव्हते. त्यानंतर गोळे यांनी डोंबिवलीसारख्या शहरी भागात फिरून हयातीचा दाखला सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तेथेही ते उपलब्ध झाले नाही. एका सैनिकाची सेवा करता आली नसल्याने मी स्वतः त्यामुळे बेचैन होतो. मग इरिस स्कॅनर आणून 15 ऑगस्टला पालीवरून डोंबिवली येथे गोळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या डोळ्यांचा स्कॅन घेऊन हयातीचा दाखला काढून त्यांना अनोखी सलामी दिली. त्यामुळे आता गोळे यांची पेन्शन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या अनोख्या मदतीबद्दल सचिन गोळे यांनी निलेश शिर्के यांचे आभार मानले.

जवानांचा सन्मान व सेवा करण्याची संधी फार कमी मिळते. आज ही संधी मला मिळाली, त्यामुळे खूप समाधानी आहे. प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने देशसेवेसाठी झटणार्‍या सैनिकांचा सन्मान करायलाच पाहिजे.
निलेश शिर्के, पाली

Exit mobile version