खारघर प्रभाग क्रमांक 6 आणि 4 मध्ये बंडखोरांनी दाखल केले अर्ज
| पनवेल | प्रतिनिधी |
बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून ऐनवेळी एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. तरी सुद्धा भाजपाकडून तिकीट नाकरण्यात आलेल्या माजी नगरसेवकांनी बंडखोरी केली असून खारघर वसाहतीमधील प्रभाग क्रमांक 4 आणि 6 मधील माजी नगरसेवकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील नेत्रा पाटील यांचा समावेश असून, त्यांचे पती किरण पाटील यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाटील यांच्या प्रमाणेच प्रभाग क्रमांक 6 मधील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांना देखील पक्षांकडून तिकीट नाकरण्यात आले आहे. त्यामुळे बाविस्कर यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तसेच, प्रभाग क्रमांक 4 मध्ये एका दिवसापूर्वी कॉलनी फोरममधून पक्षात प्रवेश केलेल्या मधू पाटील यांना उमेदवारी दिल्याने अभिमन्यू पाटील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाकडून कामोठे वसाहतीमधील माजी नगरसेवक गोपीनाथ पाटील आणि आरोग्य सभापती पद भूषवलेले डॉ. अरुणकुमार भगत यांचे तिकीट देखील कापले असून, नवीन पनवेलमधील माजी नगरसेविका ॲड. वृषाली पाटील यांना देखील पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने माजी नगरसेविकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील वरिष्ठांना प्रयत्न करावे लागणार आहे.






