माजी क्रिकेटर सचिनने दिला आचरेकर यांच्या आठवणींना उजाळा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
सरांनी आम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींची किंमत शिकवली. आम्हाला ते नेट्स घेऊन यायला, खेळपट्टीवर रोलर फिरवायला आणि पाणी मारायला सांगायचे. यामुळे नकळत खेळपट्टीशी आमची अधिक ओळख होत गेली. आचरेकर सरांची क्रिकेट शिकवण्याची ही पद्धत होती. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. आज अनेक खेळाडू आपल्या अपयशाचे नैराश्य बॅट किंवा इतर साहित्य फेकून व्यक्त करतात. मात्र, आचरेकर सरांनी आम्हाला कायम या साहित्याचा आदर करण्यास शिकवले, अशी आठवण माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सांगितली.
दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शिवाजी पार्क येथे आचरेकर यांच्या स्मारकाचे सचिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवलेले विनोद कांबळी, बलविंदर संधू, प्रवीण अमरे, पारस म्हांब्रे, समीर दिघे, संजय बांगर या माजी क्रिकेटपटूंसह आचरेकर यांच्या कन्या विशाखा दळवी, तसेच या शिल्पासाठी पुढाकार घेणारे सुनील रामचंद्रन हे उपस्थित होते.
माझा भाऊ अजित क्रिकेट खेळायचा आणि आचरेकर सरांचे विद्यार्थी नसलेले खेळाडू खूप दडपण घेतात असे त्याला जाणवायचे. सरांचे विद्यार्थी मात्र कायम गाणी गात, मजा-मस्ती करत खेळायचे. ही बाब अजितने हेरली आणि त्याने मला आचरेकर सरांकडे आणले. मैदानाच्या फेर्या मारताना सरांची बारीक नजर असायची. त्यामुळे कोणीही शॉर्टकट मारला तरी सरांना काळायचे आणि त्याला आणखी एक फेरी मारावी लागायची. त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला यशासाठी शॉर्टकट न मारण्याची शिकवण मिळाली होती, असे सचिनने सांगितले.
खरे तर हे स्मारक आधीच व्हायला पाहिजे होते. आचरेकर सर म्हटले की सचिन तेंडुलकर हे नाव सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते, पण माझ्या मते जगात त्यांच्याहून अधिक खेळाडू कोणत्या प्रशिक्षकाने देशासाठी घडवले नसतील. आपल्याकडे पुतळे खूप झाल्याने मला येथे पुतळा नको होता. त्यामुळे आचरेकरांची ओळख होईल अशा स्मारकासाठी पुढाकार घेतला, असे राज ठाकरे म्हणाले.







