कृषीवलचे माजी संपादक विजय मराठे यांचे निधन

| पुणे | प्रतिनिधी |

दै. कृषीवलचे माजी संपादक विजय मराठे (पाटील) ( वय 85) यांचे गुरुवारी (दि.9) पुणे येथे निधन झाले. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि पूत्र ललित, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे. कै. मराठे यांच्यावर लोणावळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठे यांच्या निधनाबद्दल आ.जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ.पंडित पाटील, कृषीवलच्या सल्लागार संचालिका सुप्रिया पाटील, व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील आदींनी शोक प्रकट केला आहे.

कृषीवलचे संस्थापक संपादक स्व.प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ पत्रकार कै.आत्माराम सावंत यांच्या संपादनाखाली अलिबाग येथे सुरू झालेल्या कृषीवलमध्ये मराठे यांनी सहसंपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. आत्माराम सावंत यांच्या पश्‍चात विजय मराठे यांनी दै.कृषीवलमध्ये सन 1989 ते 94 या काळात संपादक म्हणून काम पाहिले. या काळात कृषीवलचे यशस्वीपणे संपादन करून दैनिकाला वेगळे स्वरूप दिले.

मुंबई मराठी संघामध्येही ते कार्यरत होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृती भवनाच्या उभारणीसाठी निधी संकलनाच्या कामात त्यांचे मोठे योगदान आहे. पत्रकार संघ कामात त्यांनी अनेक वर्षे सहभाग घेतला होता. मुळचे धुळे येथील रहिवासी असलेल्या कै. मराठे यांनी दैनिक मराठामधून आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केल्यानंतर दै. लोकसत्तामध्ये काही वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी कै. नारायण आठवले यांना सोबत घेऊन प्रभंजन हे राजकीय विषयाला वाहिलेले साप्ताहिक सुरू केले. त्यानंतर त्या दोघांनी परी हे खास महिलांसाठी असलेल्या आणखी एका साप्ताहिकाची निर्मिती केली. काही वर्षांनी आर्थिक अडचणीमुळे साप्ताहिक प्रभंजनचे प्रकाशन बंद केल्यानंतर कै. मराठे आणि कुमार कदम यांनी मिळून साप्ताहिक परी सोबतच साप्ताहिक राजधानी हे नवे नियतकालिक सुरू केले.

अत्यंत प्रेमळ, शिस्तप्रिय, लाघवी, विनोदी अशा स्वभावाच्या अनेक छटा असलेल्या कै. मराठे यांनी राजकीय पत्रकारितेत आपला ठसा उमटविला होता. त्यांच्या जाण्याने मुंबई मराठी पत्रकार संघातील अनेक ज्येष्ठ सदस्य एका चांगल्या मित्राला मुकले आहेत.

Exit mobile version