माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

। मुंबई । वृत्तसंस्था ।
गेल्या बर्‍याच काळापासून रेंज मध्ये नसलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रेंजमध्ये अले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे.

Exit mobile version