माजी मंत्री अनंत गीते यांचा आदिवासी बांधवांना पाठींबा
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
आज अनेक आदिवासी वाड्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेकदा मागणी करुनही प्रशासन, राज्यकर्ते मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. केवळ मतांसाठी आदिवासी समाज हवा, मात्र सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षित असलेला आदिवासी ढोरं न्हाय, माणूस हाय, माणुसकीची भीक नको, हक्क हवा हक्क हवा, अशा गगनभेदी घोषणा देत आदिवासी कातकरी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेण व पनवेल तालुक्यातील आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.13) बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा करण्यात आला आहे. यावेळी माजी केंद्रिय मंत्री अनंत गीते, किहिमचे सरपंच पिंटया ठाकूर, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे व अन्य नेते यांनी आदिवासी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
पेण तालुक्यातील खऊसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ, तांबडी या वाड्यांमध्ये जलजीवन मिशन आणि रस्त्यांसाठीच्या निधी मंजूर करून कार्यारंभ आदेशही दिले. परंतु या पाचही वाड्या आजही रस्ता, पाण्याविना आहेत. पेण तालुक्यातील पाच वाड्यांसह खालापूरमधील करंबेली ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा, नावांढे आदिवासी वाडी, पनवेलमधील कोरळवाडी, टोकाचीवाडी, घेरावाडी तर व पेण तालुक्यामधील वडमालवाडी, खैरासवाडी अशा अनेक वाड्या मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आहेत मागण्या पेण तालुक्यातील खऊसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ, तांबडी या पाचही वाड्यांच्या मंजूर कामांच्या वर्क ऑर्डर घेऊनही काम न करणाऱ्या ठेकेदारांवर व ठेकेदारांकडून काम करून न घेणाऱ्या अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. पाचही वाड्यांमध्ये रस्ते बनवून सर्व रस्ते डांबरी अथवा काँक्रिटीकरण करण्यात यावे. पेण तालुक्यातील या पाचही वाड्यांच्या जलजीवन मिशन योजनेतून मंजूर कामाचे कार्यारंभ आदेश घेऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. पेण तालुक्यातील वरची तांबडी आदिवासी वाडीत समाज मंदिर बांधण्यात यावे. ग्रामपंचायत दुष्मि-खारापाडा हद्दीतील खैरासवाडी येथील बेकायदा खडी क्रशरच्या ब्लास्टींगमुळे आदिवासींच्या घरांना तडे गेल्याने अनेक घरे मोडकळीस आली आहेत, वडमालवाडीसाठी हेटवणे जल वाहीनितून उद्भव स्त्रोत घेऊन पाणी पुरवठा योजना तात्काळ राबविण्यात यावी.
आदिवासी ढोर न्हाय, माणुस हाय माणुस हाय ही तुमची घोषण हृदयाला भिडणारी आहे. प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. परंतु दुर्दैवानं आदिवासी समाज उपेक्षित आहे. अन्यायाविरोधातील या लढ्याला पूर्ण पाठिंबा आहे. भविष्यात जे सहकार्य लागेल ते राजकीय नेता म्हणुन नाही तर एक सहकारी म्हणुन नक्की करेन. केवळ लढ्यापुरतंच नव्हे तर भविष्यातही बरोबर राहु. तरच आपण वेगवेगळे प्रश्न मार्गी लावू शकतो.
अनंत गीते, माजी केंद्रिय मंत्री