माजी खेळाडूंनी घेतली जय शाहंची भेट

लिजेंड्स लीगचे आयोजन करण्याची मागणी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेटमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. येत्या काळात क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच भारताच्या काही माजी खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेत त्यांना लीजेंड्स लीग आयोजित करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. तसेच, आयपीएलप्रमाणे लिजेंड्स लीगचे आयोजन करावे, अशी माजी क्रिकेटपटूंची इच्छा आहे.

सध्या जगभरात अनेक दिग्गज खेळाडूंच्या लीग खेळल्या जात आहेत, त्यापैकी जागतिक चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स, ग्लोबल लीजेंड्स लीग, लिजेंड्स लीग क्रिकेट हे प्रमुख आहेत. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग, अंबाती रायडू यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू या लीगमध्ये खेळत असतात. जगभरातील टी-20 च्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध लिजेंड्स लीगमधील अनियमितता आणि विविध समस्या पाहता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्वतःची लीजंड्स खेळाडूंची लीग देखील सुरू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आयपीएल सारखा लिलाव
बीसीसीआय सध्या आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग आयोजित करते. याचप्रमाणे लिजेंड्स लीगमध्येही शहरांनुसार फ्रँचायझी संघ असावेत आणि जगभरातील खेळाडूंसाठी बोली लावली पाहिजे. बीसीसीआयने या प्रस्तावावर शक्यता तपासण्याचे आश्‍वासन दिले आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर भारतातील प्रेक्षकांनाही माजी महान खेळाडूंमधील लिजेंड्स लीगचा आनंद लुटता येईल.
अन्य लीगला फटका
अशी लीग भारतात सुरू झाल्यास त्याचा थेट परिणाम इतर लीगवर होईल. सध्या होणार्‍या सर्व लीगचे आयोजन काही खासगी कंपन्या विविध क्रिकेट बोर्डांच्या सहकार्याने करत आहेत. कोणतेही क्रिकेट बोर्ड थेट लिजेंड्स लीगसारखी स्पर्धा आयोजित करत नाही. या वर्षी जूनमध्ये बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डच्या सहकार्याने करण्यात आले होते.
Exit mobile version