शेकापचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रेंवर प्राणघातक हल्ला

न्हावे गावातील घटना,पोलिसांचे तक्रारीकडे दुर्लक्ष
पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील न्हावे गावात शेकाप चे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रें यांच्यावर काल रात्री 8 वाजण्याच्या आसपास प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले असून त्यांच्यावर उलवे नोड येथील मिलेनियम हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे .
जखमी जितेंद्र म्हात्रे यांची रुग्णालयात पत्रकारांनी भेट घेतल्यावर त्यांनी माझ्यावर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला होणार हे पोलीसांना माहीती असुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असे धक्कादायक आरोप केले आहेत. न्हावे गावात गुंडाराज सुरु असल्याचा आरोप करीत त्यांनी हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. या प्रकरणाची नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी जितेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.
हल्ला करण्यापूर्वी जितेंद्र म्हात्रे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.परंतु तो वार म्हात्रे यांनी हाताने अडविल्याने त्यांचा जीव वाचला. जितेंद्र म्हात्रे यांनी हल्ला करणार्‍यांचा नावानिशी उल्लेख केला. हल्लेखोरांचे नाव घेऊन जितेंद्र म्हात्रे यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांसमोर ठेवला. हा हल्ला विक्रांत जयवंत भोईर, राकेश पाटील, गौतम गायकवाड आणि आणखी दोघे- तिघे असल्याचे जितेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.
या हल्ल्याची बातमी समजताच आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदींनी जितेंद्र म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Exit mobile version