। अहमदनगर । वृत्तसंस्था ।
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. बबनराव ढाकणे यांनी वयाच्या 87 व्या वर्षी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात मागील काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना निमोनियाने ग्रासले होते त्यातच त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना हृद्यविकाराटा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
बबनराव ढाकणे हे माजी केंद्रीय मंत्री असून ते चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. 1994 साली महाराष्ट्रात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिले होते. अहमनगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील अकोले या छोट्याश्या गावात 10 ऑक्टोबर 1937 ला एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. गोवा समुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी शाळा नववीत असताना सोडून दिली होती.
बबनराव ढाकणे यांनी जीवनात राजकारणात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचारांकडे ते ओढले गेले.1967 साली राजकारणात पाऊल ठेवत टाकळीमानूर गटातून त्यांनी जिल्हापरिषदेसाठी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पाथर्डी विधानसभा मतदारसंघातुन ते 1978 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पुढे ते पाच वेळेस आमदार राहिले. त्याचवेळी पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणून तर 1979 पुलोद ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम पाहिलं. 1989 साली विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी 10 नोव्हेंबर 1989 साली बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले होते.
बबनराव ढाकणे यांचं पार्थिव पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार केले जातील.