। मुंबई । प्रतिनिधी ।
गड किल्ल्यांवर सुरक्षितता आणि सांस्कृतिक ऐतिहासिकता संवर्धनाच्या उद्देशाने, 31 डिसेंबर रोजी गड किल्ल्यावर हुल्लडबाजी, विक्षिप्त वर्तन करणाऱ्यांवर दुर्ग रक्षकांची करडी नजर असणार आहे.
गड किल्ले निव्वळ वास्तू नाहीत, ते आपल्या पूर्वजांच्या त्यागाचे आणि पराक्रमाचे स्मारक आहेत. महाराजांनी स्वराज्यासाठी कष्टाने उभारलेल्या या ठिकाणी नाचगाणी आणि पार्ट्या करून त्यांचा अपमान करू नका. प्रत्येक गडावर पाऊल ठेवताना त्याच्या मातीला नमन करा आणि त्यागाचा इतिहास समजून घ्या. जिथे तोफांचे आवाज घुमले, तिथे सन्मान आणि शिस्त राखा. गड किल्ले मौजमजेसाठी नव्हेत, तर प्रेरणा घेण्यासाठी आहेत. त्यांना साजरे करा, पण त्यांच्या पवित्रतेला मलीन करू नका. पोलीस प्रशासनाने सतर्क राहून गैरवर्तन करणा-या समाज कंटकांवर व हुल्ल्लडबाजांवर कारवाई करावी. तसेच, इतिहास संपन्न गड किल्ल्यांची जपणूक आणि संस्कृतीचे रक्षण याबाबत प्रशासनाने तसेच समस्त दुर्गरक्षकांनी सतर्क राहून कडक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे आवाहन साद सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक मोरे यांनी केले आहे.






