पूरस्थिती रोखण्यासाठी तटबंदीचा उपाय

। मुंबई । वृत्तसंस्था ।
वातावरण बदलांमुळे निर्माण होणार्‍या संभाव्य समस्यांना तोंड देण्यासाठी ठोस आराखड्याची गरज असून त्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात यावी, तसेच जल प्रलयापासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबईभोवती तटबंदी बांधण्याचा उपाय समोर आला आहे. मुंबई फर्स्ट या विचारमंचाने याबाबत शासनाला सूचना दिल्या आहेत. वातावरणातील बदल आणि तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन समुद्र किनार्‍यावरील शहरे पाण्याखाली जाण्याचे भाकीत करण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भाग समुद्र गिळंकृत करण्याचेही भाकीत वर्तवण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य धोक्याना तोंड देण्यासाठी मुंबई फर्स्टने शासनाला काही उपाय सुचवले आहेत. मुंबईत भरतीच्यावेळी शिरणार्‍या पाण्यामुळे अनेक भाग जलमय होतात. येत्या काळात ही समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्याला अटकाव करण्यासाठी समुद्राच्या बाजूला धरणाप्रमाणे भिंत बांधण्याचा उपाय सुचवण्यात आला आहे. यामुळे शहरात शिरणारे पाणी अडेल आणि शहरातील पाणी उदचन यंत्रणेच्या माध्यमातून बाहेर काढता येईल. याच बरोबर पूरस्थिती, हवामान याचे अचूक पूर्वानुमान देणारी यंत्रणाही सक्षम करणे आवश्यक आहे असे मुंबई फर्स्टचे नरेंद्र नायर यांनी सांगितले.

Exit mobile version