| पनवेल | प्रतिनिधी |
मोबाईल क्रमांकावर संपर्क करून मित्र बोलत आहे असे भासवले आणि मित्राकडून 50 हजार रुपये पाठवण्यास सांगतो असे बोलून खोटे टेक्स्ट मेसेज पाठवून 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरोधात 23 जुलै रोजी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
73 वर्षीय उत्तम बोराडे हे खारघर येथे राहात असून, त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला आणि मी वर्मा बोलत असून, पुण्याचा एक मित्र आहे तो तुला पन्नास हजार रुपये पाठवणार आहे, जेव्हा पैशाची गरज वाटेल तेव्हा मी तुझ्याकडून मागून घेईन असे बोलून फोन ठेवला. त्यानंतर त्यांना अनोळखी क्रमांकवरुन टेक्स्ट मेसेज आले. यात 50 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज होता. त्यांनी त्यांचे खाते चेक केले नाही व तो मेसेज खरा असल्याचे त्यांना वाटले. त्यानंतर समोरील इसमाने पुन्हा फोन केला आणि अनिल दवाखान्यात ऍडमिट असल्याचे सांगून 20 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यांनी 20 हजार रुपये पाठवले. काही वेळाने पुन्हा वीस हजार रुपये पाठवण्यास सांगितले असता त्यांनी वीस हजार रुपये पाठवले. पुन्हा दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले, मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी समोरील इसमाचे फोन उचलणे बंद केले. काही वेळाने त्यांना 75 हजार रुपये खात्यावर पाठवल्याचा मेसेज आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच क्रमांकावरून फोन आला. त्यांनी फोन उचलला, नंतर त्या इसमाचा आवाज ओळखला आणि फोन कट केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला.







