। उरण । वार्ताहर ।
14 एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. देशातील कोट्यवधी दिनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीने प्रकल्पग्रस्त संघर्ष करीत आहेत. केंद्र व राज्य सरकारचे लोकसेवक 40 वर्षे पुनर्वसनाची फसवणूक आणि दिशाभूल करत असल्याने त्याचा तपास सीआयडी, सीबीआय यंत्रणेने करावा आणि दोषींना शिक्षा करावी, या मागणीसाठी सोमवारी तहसिलदार कार्यालय उरण येथे शेवा कोळीवाडा विस्थापितांनी आमरण उपोषण केले. तहसीलदार उद्धव कदम यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने शेवा कोळीवाडा विस्थापितांनी उपोषण स्थगित केले.
पोलीस उप निरीक्षक सागरी मोरा पोलीस ठाणे यांनी विस्थापितांनी शासनाने पुनर्वसनासाठी दिलेल्या 17 हेक्टर जमिनी पैकी 15 हेक्टर जमीन वन विभागाला देणार्या लोकसेवकावर केलेल्या लेखी तक्रारीबाबत तहसिलदार उरण यांच्याकडे अहवाल मागीतला होता. त्या प्रमाणे तहसिलदार उरण यांनी पोलीस उपनिरीक्षक, सागरी पोलीस ठाणे यांना दिलेल्या अहवालात जिल्हाधिकारी रायगड यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी, बिगर शेतकरी 256 कुटुंबांचे बोरीपाखाडी, उरण येथे 17 हेक्टर जमिनीत शासनाच्या माप दंडाने पुनर्वसन मंजूर केले होते.
बोरीपाखाडी उरण येथील 17 हेक्टर जमीन संपादन केली होती. त्या जमिनीवर सहाय्यक संचालक नगर रचनाकार अलिबाग यांनी शासनाच्या माप दंडाने नकाशात शेतकरी, बिगर शेतकरी 256 कुटुंबांची आखणी केलेली होती.जेएनपीटी (जेएनपीए )व्यवस्थापनाने 16 लक्ष 90 हजार फंड दिला होता.त्या रक्कमेत जिल्हाधिकारी यांनी सन 1986 साली 17 हेक्टर शेत जमिनीपैकी 2 हेक्टर जमीन विकसित केली होती.उर्वरित शिल्लक राहिलेली 15 हेक्टर शेत जमिनीची समुद्राच्या भरती ओहोटीच्या क्रियेने बांधबांदिस्ती तुटून त्या जमिनीत समुद्राचे पाणी आत येत असल्याने, प्रवाहासोबत वाहून आलेल्या कांदळाच्या झाडाच्या बिया नैसर्गिक क्रियेने रुजून आज कांदळ वन झालेले आहे. म्हणून ती 15 हेक्टर जमीन वन विभागाला दिली आहे. जिल्हाधिकारी यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी 256 कुटुंबांचे बोरीपाखाडी, उरण येथील 17 हेक्टर जमीनीत 40 वर्षात पुनर्वसन केलेले नाही. आणि बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा आहे.त्याचा हा सबळ पुरावा आहे. त्यामुळे शेवा कोळीवाडा विस्थापित नागरिकांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी विस्थापित हनुमान कोळीवाडा तर्फे उरण तहसील कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधान कायद्याची आठवण करून देत होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषण करण्यात आले.यावेळी उरण तहसील कार्यालयासमोर शेवा कोळीवाडा विस्थापित प्रकल्पग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.