| पुणे | वृत्तसंस्था |
कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे 45 हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला असून वाहतूक करणा-या तरुणाला अटक केली आहे.
अजय किसन गुमाने (वय 21) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून मंगळवारी (दि.5) रात्री आठ वाजताच्या सुमारास शहरातील महाडनाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. कोकणात विक्रीसाठी गांजा पाठविण्यात येणार असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महाड नाका परिसरात पाळत ठेवली. रात्री आठच्या सुमारास महाड नाक्यावरील महाडला जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर अजय गुमाने आढळला. त्याच्याजवळील पोत्यात साडेचार किलो गांजा आढळून आला असून त्याला अटक केली आहे. अजय गुमाणे याने गांजा कोठून आणला आणि कोणाकडे पाठविणार होता, याचा तपास भोर पोलिस करीत आहेत.