। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील विविध भागात वीज रोहित्र यांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या वीज रोहित्र चोरी प्रकरणी नेरळ पोलिसांच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले असून, आणखी काही वीज रोहित्र चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नेरळ परिसरातील धामोते गावातील वीज रोहित्र ऑगस्ट 2025 चोरीला गेले होते. त्या वीज रोहित्र बद्दल कोल्हारे ग्रामपंचायत कडून नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर नेरळ पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला या वीज रोहित्र चोरीचा तपास करण्यास पाठवले. या पथकाचे आशू बेंद्रे, राजाभाऊ केकान आणि सचिन वाघमारे यांच्या पथकाने नेरळ कळंब रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि गुप्तहेर यांची मदत घेऊन वीज रोहित्र चोरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संशयितांचा पाठलाग केला असता संशयितांची टोळी असल्याचे पोलिसांच्या पथकाच्या निर्दशनास आले. त्यानंतर नेरळ पोलिसांनी प्रथम मुरबाड तालुक्यातील शिलंद येथून विष्णू भालचंद्र कडाळी याला ताब्यात घेतल्यावर या टोळीचा पर्दाफाश लागला आहे. पोलिसांनी विज रोहित्र चोरणारी टोळी उघडकीस आणली असून, आतापर्यंत तीन वीज रोहित्र चोरल्याची कबुली या तरुणांनी दिली आहे.
धामोते तसेच माथेरान येथील दस्तुरी आणि भक्ताची वाडी येथील वीज रोहित्र या चोरट्यांनी चोरून त्यांची विक्री ठाणे जिल्ह्यात केली आहे. या टोळी मधील फोंड्याचीवाडी येथील चंदर ठोंबरे, नितीन हिंदोळा आणि सुनील हिंदोळा या तिघांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी केली असून, अधिक चोरीची उकल होण्याची शक्यता आहे. वीज रोहित्र चोरांच्या टोळीचा तपास नेरळ पोलीस करीत असून, कर्जत आणि माथेरान तसेच आजुबाजूच्या जिल्ह्यातील वीज रोहित्र चोरीच्या घटना उघड होणार आहेत.






