| महाड | प्रतिनिधी |
तालुक्यात कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे नेण्यात येणाऱ्या चार गायींची महाड एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पिकअप वाहन जप्त करून दोन आरोपींना अटक केली असून, एका अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांगलवाडी हद्दीतील मुंबई-गोवा महामार्गावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच 06 बीडब्ल्यू 9355) मधून चार गायींची दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता गायींना बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ चारही गायींची सुटका केली असून, सुमारे दहा लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन व अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे पशुधन असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी असलम अब्दुल पेवेकर (50, रा. वरंध, ता. महाड), संतोष गंगाराम तांबे (31, रा. किये बौद्धवाडी) गोरेगाव येथील एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.






