जिल्ह्यात चार दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध
| अलिबाग | प्रतिनिधी |
वेगवेगळे आजार, शस्त्रक्रीया अशा अनेक कारणांमुळे रक्ताची गरज महत्वाची ठरत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये चार दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. रक्ताची मागणी वाढल्याने रक्ताचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या धार्मिक, राजकिय, सामाजिक संस्थांसह महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी शिबीराच्या माध्यमातून रक्तदाता म्हणून भुमिका बजावतात. त्यामुळे रक्ताची आवश्यकता असणाऱ्यांना रक्तपेढीतून रक्ताचा वेळेवर पुरवठा होतो. रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होते. वेगवेगळ्या अपघातांमुळे जखमी तसेच गरोदर महिलांना शस्त्रक्रीयेच्या दरम्यान तसेच वेगवेगळ्या आजारातील रुग्णांना रक्तांची गरज भेडसावत आहे. त्यामुळे रक्तांचे संकलन करून ठेवणे आवश्यक आहे. अनुवंशिक आजार असलेल्या रुग्णांसह अपघातग्रस्त, प्रसुतीसाठी आलेल्या महिला, शस्त्रक्रीयेसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात मागणी असते. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र असे रक्त संकलन विभाग आहे. या विभागामार्फत गरजूंना रक्त पुरवठा केला जातो. रुग्णालयातील रक्त पेढी विभागाला दर आठवड्याला रक्ताच्या 150 पिशव्यांची गरज असते. दिवसाला 25 रक्ताच्या पिशव्या लागतात. परंतु रुग्ण संख्या वाढल्याने रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यात बी व ओ गटाच्या रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती रक्त संकलन विभागाकडून देण्यात आली आहे.
संकलनासाठी आवाहन रायगड जिल्हयात रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने रक्त संकलन विभागाकडून रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले आहे. रविवार 3 सप्टेंबर रोजी रोहामधील खारी, भरडखोलमध्ये रविवारी 8 सप्टेंबर, गोवे येथील तटकरे कॉलेजमध्ये बुधवारी 9 सप्टेंबर, पेण येथे गुरुवारी 10 सप्टेंबर तसेच गणेशोत्सव मंडळाच्यावतीने 20 ते 24 सप्टेंबर या कालावधीत गोंडेघर, बोर्ली पंचतन, चणेरा, भुनेश्वर या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था संघटनाच्यावतीने रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे. जिल्हयातील नागरिकांनी या रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले जात आहे.
सध्या रक्ताचा पुरवठा कमी आहे. सध्या चार दिवस पुरेल इतका रक्ताचा साठा उपलब्ध आहे. नियमीत रक्तदान केल्याने रक्तपेढीमध्ये मुबलक प्रमाणात रक्ताचा पुरवठा होणार आहे. यातून अनेकांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिरे राबवून सहकार्य करावे.
डॉ. दीपक गोसावी, रक्त संक्रमण अधिकारी
रक्त पुरवठ्यावर दृष्टीक्षेप ए पॉझिटीव्ह - 51 बी पॉझिटीव्ह - 10 ओ पॉझिटीव्ह - 20 ए व बी पॉझिटीव्ह - 12 एकूण - 93