। ठाणे । प्रतिनिधी ।
अंबरनाथ एमआयडीसी परिसरात दुर्मिळ पिसोरा जातीच्या हरणाची शिकार करणार्याला वनविभागाच्या आधिकार्यांनी अटक केली आहे. जगदिश वाघ (25) असे शिकार करणार्याचे नाव आहे. बदलापूर वन परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे आणि वनपाल वैभव वालिंबे यांच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला चार दिवसांची वन कोठडी न्यायालयाने सुनावण्यात आली आहे.
अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी परिसरात 23 सप्टेंबर रोजी पिसोरा हरणावर तीन गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. गोळी लागल्याने हरिण पळताना उंचावरून खाली पडल्याने ते अनेक ठिकाणी जायबंदी झाले होते. जखमी हरणाला बदलापूर वनविभागाने तात्काळ बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनविभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान हरणाचा 26 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता.