| रायगड | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान मुंबई शहरासह उपनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. याबाबत आयएमडीने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाने याबाबत वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार 27 ते 30 सप्टेंबर रोजी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवार (दि.26) ते शनिवार (दि.27) दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.






