| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उकरुल गावातील व्यक्तिच्या गणरायाचे विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.28) घडली. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीत मोठ्या संख्येने अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येते. मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत असतानाच गणेश विसर्जन करणाऱ्या चार तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले तर अन्य तिघांचा मृत्यू झाला.
उकरुळ गावातील मॅपल अपार्टमेंट येथे राहणारे गणेशभक्त चेतन सोनावणे यांच्या घरी त्यांचे मित्र गणेशोत्सवासाठी आले होते. दुपारी चार वाजता चेतन सोनावणे आणि त्यांचेसह आठ जण उल्हास नदीवर चांधई येथील गणेश घाटावर बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी निघाले होते. साधारण पाच वाजण्याच्या सुमारास चेतन सोनावणे यांच्या बाप्पाचे विसर्जन सुरू असताना त्यांचे पुणे येथील मित्राचा मुलगा यश जगदीश साहू हा उल्हास नदीच्या पात्रात पाय घसरून वाहून जात असल्याचे रोहन रंजन यांनी पाहिले. त्याला वाचवण्यासाठी रोहनने पाण्यात उडी घेतली. त्यासोबत त्या दोघांना वाचविण्यासाठी चेतन सोनावणे आणि जगदीश साहू यांनी देखील पाण्यात उड्या मारल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने रोहन रंजन हे पोहत किनाऱ्यावर आले, मात्र यश साहू आणि चेतन सोनावणे यांचा काही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, पाण्यातून एक मुलगा वाहून जात असल्याचे पाहून चांधई आदिवासी वाडीमधील शंकर कातकरी या तरुणाने पाण्यात उडी घेत त्या व्यक्तीला बाहेर काढले. 15 वर्षीय यश साहू याला चांदई गावातील सुनील रसाळ, मनोज रसाळ, विक्रम रसाळ यांनी कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुहास गरड हे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, तसेच प्रांत अधिकारी अजित नैराले आणि तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांना माहिती दिली. तसेच उल्हास नदीच्या चांदई भागापासून पुढे काही अंतरावर नेरळ पोलीस ठाण्याची हद्द सुरू होत असल्याने नेरळ पोलीस ठाणे यांना देखील अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. तर प्रांत अधिकारी यांनी खोपोली येथून अपघातग्रस्त टीम यांना बोलावून घेण्याचा निर्णय घेतला. रात्री आठ वाजता ही टीम चांदई येथे पोहचली होती. तेथे तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली अंधारात सर्च ऑपरेशन सुरू झाले.मात्र नदीचे पाणी वाढत असल्याने अंधारात वाढत्या पाण्याचा अंदाज घेता येत नसल्याने प्रशासनाने रात्री साडे नऊ वाजता ही सर्च मोहीम थांबवली.
आज सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. खोपोली येथील गुरुनाथ साठलेकर यांचे पथक सकाळी उल्हास नदी येथे हजर झाले. तर उल्हास नदीमध्ये पुढे पेज नदी मिळत असल्याने पाण्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेवून कोलाड येथील बोटी मागवण्यात आल्या. त्या बोटीचे माध्यमातून शोध कार्य सुरू झाले. सकाळी दोन तास चांदई परिसरात शोध घेतल्यानंतर देखील चेतन सोनवणे आणि जगदीश साहू यांचे मृतदेह आढळून आले नाहीत. त्यामुळे आंबिवलीपासून पुढे मालेगाव दहीवली पुलापर्यंत शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजता जगदीश साहू यांचा मृतदेह घटनास्थळाजवळ आढळून आला. तर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चेतन सोनावणे यांचा मृतदेह नसरापूर भागात सापडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सकाळी कर्जत येथे येवून माहिती घेतली.