कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
| ठाणे | प्रतिनिधी |
मध्यप्रदेशातून मेफेड्रॉन या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. बब्बु खिजहार खान उर्फ इम्रान (37), वकास अब्दुलरब खान (30), ताकुद्दीन रफीक खान (30) आणि कमलेश चौहान (23) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.
ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरु होती. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबरला पथकाने ठाण्यातील चरई भागात सापळा रचून इम्रान, वकास, ताकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेले दोन कोटी 14 लाख 32 हजारांचे एक किलो 71 ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचे एमडी हस्तगत केले आहेत. तस्करीसाठी वापरलेल्या एका कारसह दोन कोटी 24 लाख 75 हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना 15५ नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या चौघांपैकी इम्रान आणि कमलेश हे दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.







