भारताच्या खो-खो संघात महाराष्ट्राचे चौघे

| मुंबई | प्रतिनिधी |

भारत-मलेशिया यांच्यामध्ये कुमार-मुली अशा दोन्ही विभागांमध्ये खो-खो मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन देशांमधील ही मालिका 12 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या मालिकेसाठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कुमार संघात धाराशिवचा किरण वसावे आणि मुंबई उपनगरचा निखिल सोडिये याची निवड करण्यात आली असून, भारताच्या मुलींच्या संघात धाराशिवची संपदा मोरे आणि सोलापूरची प्रीती काळे यांना संधी मिळाली आहे.

निखिल सोडियेने भारतीय खो-खो महासंघाच्या किशोर/कुमारी राष्ट्रीय स्पर्धेत आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच त्याने पाचव्या ‌‘खेलो इंडिया’मध्येही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. नरेंद्र कुंदर त्याचे प्रशिक्षक आहेत. किरण वसावे याने भारतीय खो-खो महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किशोर गटात दोन वेळेस व कुमार गटात चार वेळेस प्रतिनिधित्व करीत दमदार कामगिरी केली. या स्पर्धेतील वीर अभिमन्यू पुरस्काराचाही तो मानकरी ठरला.

संपदा मोरे हिने दोन शालेय राष्ट्रीय स्पर्धा, भारतीय खो-खो महासंघाच्या दोन मुलींच्या व एक महिला विभागाची राष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा गेम व खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला असून, सर्व स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.प्रीती काळे हिने शालेय व भारतीय खो-खो महासंघाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत नऊ वेळा महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले. भारतीय खो-खो महासंघाच्या कुमार राष्ट्रीय स्पर्धेतील जानकी पुरस्काराची मानकरी ठरली असून, ‌‘खेलो इंडिया’ स्पर्धेतही सहभाग घेतला आहे.

Exit mobile version