एकेरीत चार भारतीय खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत

आयटीएफ टेनिस स्पर्धा

| मुंबई | वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए 25 हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत मुख्य सोडतीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत रामकुमार रामनाथन, सिद्धार्थ विश्वकर्मा, एसडी प्रज्वल देव आणि सिद्धार्थ रावत या चार भारतीय खेळाडूंनी विजयी मालिका कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य सोडतीमध्ये उप-उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या तिसऱ्या मानांकित रामकुमार रामनाथन याने देव जावीयाचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजयी घौडदौड कायम राखली. संघर्षपूर्ण लढतीत भारताच्या सिद्धार्थ विश्वकर्मा याने जपानच्या र्योतारो तागुचीचा टायब्रेकमध्ये 6-7(2), 7-6(3), 6-2 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. सिद्धार्थ रावतने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या राघव जयसिंघानीचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

अव्वल मानांकित रशियाच्या एव्हेग्नी डोन्स्कॉयने क्वालिफायर भारताच्या आर्यन शहाचे आव्हान 6-2, 6-1 असे संपुष्टात आणले. सातव्या मानांकित एस डी प्रज्वल देव याने सिद्धांत बांठियाला 6-3, 6-4 असे पराभूत केले. जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित लुई वेसेल्स याने जपानच्या युइचिरो इनुईचा 6-4, 7-6(0) असा पराभव करून आगेकूच केली. अमेरिकेच्या हॅरिसन ॲडम्स याने ऑस्ट्रियाच्या आठव्या मानांकित डेव्हिड पिचलरचा 6-3, 6-4 असा पराभव करून पुढच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.

Exit mobile version