। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-पेण मार्गावर आज दुपारी दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील चार पर्यटक गंभीर जखमी झाले. त्यांना अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग-पेण मार्गावरील मैनुशेठ वाड्याजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. या अपघामध्ये दोन्ही कारचे खूप नुकसान झाले. कारमधील तीन महिला व एक पुरुष अशा चौघांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती पोयनाड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी सुरळीत करण्याबरोबरच स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.