सोन्याच्या दागिन्यांसह 90 हजाराची रोकड लंपास
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील मानिवली येथील महेंद्र तुकाराम गवळी हे बाहेरगावी गेले होते. त्यावेळी बंद घराच्या पडवीमधून मधून वाट काढीत घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.दरम्यान, साधारण चार लाखाच्या घरफोडी प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानिवली येथील रहिवाशी महेंद्र तुकाराम गवळी हे आपल्या सासुरवाडी येथे नेवाळी गावी श्री सत्यनारायण पूजेसाठी सायंकाळी पाच वाजता घरातून निघाले होते. सह कुटुंब नेवाळी गावी हे कुटुंब पोहचले होते, मात्र साडे आठ वाजता महेंद्र गवळी यांचा पुतण्या हा त्यांच्याकडे असलेल्या चवीने दरवाजा उघडून घरात गेला असता घरात चोरी झाल्याची लक्षात आले. त्याने तात्काळ महेंद्र गवळी यांना दूरध्वनी वरून चोरी झाल्याची माहिती दिली.घराच्या पडवीच्या पत्र्यावर चढून किंवा उघड्या खिडकीतून प्रवेश करीत चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातील बेडरूममध्ये असलेल्या दोन लाकडी कपाटे फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत माहिती मिळताच नेवाळी येथे पोहचलेले गवळी कुटुंबीय मानिवली येथील घरी पोहचले.
घरातील लाकडी कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याची गंठण, कानातील कर्णफुले आणि सोन्याचा हार असा सव्वा तीन लाखाचा ऐवज लंपास केला. तर कपाटात असलेली 90 हजाराची रक्कम देखील चोरट्यांनी लंपास केली. याबाबत महेंद्र तुकाराम गवळी यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून चोरीच्या दाखल केली. नेरळ पोलिसांनी 29 एप्रिल रोजी येथून श्वान पथक यांना निमंत्रित करीत चोरीच्या घटनेचा शोध लावण्यास सुरुवात केली आहे. नेरळ पोलीस ठाणे येथे 131/2022 भा.दं.वि.क. 457 , 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.आर.काळे हे करीत आहेत.