केंद्र सरकारचा मोठा निर्णय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात नवीन श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील कामगारांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात नवीन कामगार संहिता अर्थात लेबर कोड लागू करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर शुक्रवार (दि. 21) अखेर केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता लागू करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) दिली आहे. आता नवीन संहितेमुळे तब्बल 40 कोटी कामगारांना सुरक्षा कवच देण्यासह सर्व कामगारांना वेळेवर आणि किमान वेतनाची हमी देण्यात आली असल्याचं मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कोणत्या संहिता लागू करण्याचा निर्णय?
केंद्र सरकारने आजपासून लागू केलेल्या नवीन कामगार संहितांमध्ये वेतन संहिता (2019), औद्योगिक संबंध संहिता (2020), सामाजिक सुरक्षा संहिता (2020) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता (2020) या संहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.







