पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत


| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पंचशील नगर झोपडपट्टीत छापा टाकून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केल्यानंतर अमली पदार्थविरोधी कक्षाने या प्रकरणाचा अधिक तपास करत मुख्य सूत्रधार महिलेसह आणखी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी शकील मोहम्मद आयुब शेख याला ताब्यात घेत त्याच्या घरातून सुमारे 1 लाख 5 हजार रुपये किमतीचे 3.5 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. त्यानंतर या ड्रग्ज विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार राणी रवी जोसेफ हिच्यासह नितीन रमेश चौहान ऊर्फ नितीन भैय्या आणि प्रदीप कमलाकर गायकवाड या तिघांना 26 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थविरोधी कक्षाने पंचशील नगर परिसरात कारवाई करून कबीर सलीम शेख (19) आणि विकास ऊर्फ विक्की कलाप्पा गायकवाड (22) यांना अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी 510 ग्रॅम गांजा, तीन महागडे मोबाईल, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 5 लाख 72 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

या प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांनी शकील मोहम्मद आयुब शेख याला ताब्यात घेतले. पनवेल येथील त्याच्या घराची झडती घेतली असता 3.5 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आढळून आले. त्यामुळे पनवेल परिसरात केवळ गांजाच नव्हे, तर इतर अमली पदार्थांचाही पुरवठा सुरू असल्याचे तपासातून समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासात राणी रवी जोसेफ ही गांजा विक्रीच्या नेटवर्कची मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्यासह नितीन रमेश चौहान ऊर्फ नितीन भैय्या आणि प्रदीप कमलाकर गायकवाड यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पनवेलमधील अमली पदार्थ विक्रीच्या साखळीतील महत्त्वाचे दुवे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यातील नवाज शेख, अरुण लाल सय्यद, रईस लाल सय्यद, रईस सय्यद, तातू शेख, आकाश जोसेफ आणि गोवंडीतला सलमान हे सात आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निघडे यांनी दिली.

आरोपींच्या चौकशीत गोवंडी ते पनवेलदरम्यान सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे या संपूर्ण ड्रग्ज सिंडिकेटचा आर्थिक व्यवहार, अमली पदार्थांचा पुरवठा आणि विक्रीचे जाळे याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

पनवेल परिसरातील अमली पदार्थांच्या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच या टोळीला अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version